असोसिएशनची ३७ वी वार्षिक सर्व साधारण सभा, गुरुवार दि. ३१.०८.२०२३ रोजी दुपारी ११.३० वाजता वसई जनता सहकारी बँक लि. यांच्या सौजन्याने, हॉटेल रुद्र शेल्टर, तुंगारेश्वर फाटा, राष्ट्रीय महामार्ग ८ (On NH-8), सातीवली, वसई (पूर्व), पालघर येथे आयोजित करण्यात आली होती.

सभेस एकूण १४ सभासद बँकांचे मिळून ४२ संचालक / अधिकारी उपस्थित होते. वसई जनता सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष श्री. महेश देसाई यांनी सभेस आलेल्या सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच बँकेचे सुवर्ण समिती अध्यक्ष मा. श्री. संदेश जाधव यांनी वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेतर्फे सर्व उपस्थित मान्यवर बँकांना मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच सर्वांना भेटवस्तू देण्यात आली.

सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षात सभासद बँकांचे जे आजी–माजी संचालक आणि ज्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीच्या थोर नेत्यांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. सभेस उपस्थित असलेल्या मान्यवरांना सभेपुढील विषय वाचून दाखविण्यात आले व संबंधित विषयाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच चर्चेअंती उपस्थितांनी असोसिएशनच्या मा. अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष यांना विनंती केली की, करोना काळापासून अभ्यासदौरा व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात खंड पडला आहे. हे दोन्ही कार्यक्रम असोसिएशनचे महत्वाचे व मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रम असल्याने, सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यास पुन्हा सुरुवात करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

सभेच्या शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि, वर नव्याने निवडून आलेल्या मा. संचालिका श्रीमती. रूपा देसाई – जगताप, मा. संचालक श्री. मधुसूदन पाटील व महाराष्ट्र अर्बन को. ऑप. बँक्स फेडरेशन लि. चे मा. संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी काही मान्यवरांनी त्यांचे थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
सभेच्या समारोप प्रसंगी असोसिएशनचे मा. अध्यक्ष श्री. विलास देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सर्व उपस्थितांना आपल्या बँकेतील काही गोष्टींकडे आवर्जुन लक्ष देण्याची विनंती केली. तसेच, येणारा काळ पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्याने बँकेतील संगणक प्रणालीत आवश्यक ते बदल करून सतर्क राहून आपल्या बँकेची प्रगती घडवून आणण्यास सांगितले. असोसिएशनवर गेली २५ वर्षापासून अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविताना बदलत जाणारा काळ आणि त्याप्रमाणे कामकाजात करावे लागलेले बद्ल याबाबत थोडक्यात माहिती सभेस दिली. त्यानंतर वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली.