पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) ही युनिटी बँकेत विलीन करण्याच्या योजनेचा मसुदा रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आला असून त्यावर सूचना मागवल्या होत्या.
सदर मसुद्याप्रमाणे या बँकेतील संस्थात्मक ठेवींच्या बव्हंशी रकमा या खुपच विलंबाने, म्हणजे दहा वर्षांनंतर परत केल्या जाणार असून, त्यावर पहिली पाच वर्षे शून्य व्याज व नंतर केवळ पावणे तीन टक्के व्याज प्रस्तावित आहे.
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने याबाबत रिझर्व्ह बँकेला निवेदन दिले आहे.
“अनेक सहकारी बँकांच्या ज्या ठेवी पीएमसी बँकेत आहेत, त्यातील दोन कोटीपर्यंतची रक्कम ही रिटेल ठेवींप्रमाणे व प्राधान्य क्रमाने परत करण्यात यावी. तसेच, या बँकांच्या सर्व ठेवींवर पहिल्या वर्षापासून किमान वार्षिक चार टक्के वा त्याहून अधिक दराने व्याज देण्यात यावे आणि सर्वच ठेव रकमा या व्याजासह कमाल पाच वर्षांच्या आत परत केल्या जाव्यात.” अशी आग्रही मागणी असोसिएशनने या निवेदनात केली आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका या असोसिएशनच्या सदस्य असून असोसिएशनचे कार्यालय कल्याण येथे आहे.
श्री. उत्तम जोशी
मानद सचिव
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि,